Our Blog

भविष्यातील स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा शिरकाव व बदलते बांधकाम क्षेत्र

 

स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये मध्ये मोठ्या व आमूलाग्र बदलांची चाहूल होत आहे. गेल्या दशकापर्यंत पारंपारिक बांधकामाचे प्रकार, स्मार्ट मटेरिअल्स, ऊर्जा कार्यक्षम इमारती या चाकोरी मध्ये अडकलेले स्थापत्य अभियांत्रिकी तंत्रज्ञानातील नवीन बदलांमुळे आपल्या कक्षा अधिक विस्तृत करू लागले आहे. तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलामुळे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये नेमका काय बदल होऊ पाहत आहे व त्यामुळे भविष्यातील बांधकाम क्षेत्र नक्की कसे असेल हे आताच जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यात कोणत्या तंत्रज्ञानाला महत्व असणार आहे हे जाणून घेण्याच्या उद्देशाने या लेखात प्रकाशझोत टाकलेला आहे. हा लेख नक्कीच बांधकाम क्षेत्राची आवड असणाऱ्या लोकांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

बांधकाम क्षेत्रात शिरकाव करणारे नवीन तंत्रज्ञान विस्तृतपणे समजावून घेऊ.  

१. आभासी वास्तविकता व वर्धित वास्तविकता - [Virtual Reality (VR) and Augmented Reality (AR)]

आभासी वास्तविकता (VR ) हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे बांधकाम क्षेत्रातील जुन्या समस्या सोडवून बांधकाम उद्योग बदलत आहे. बांधकामातील आभासी वास्तविकता हे थ्रीडी (3D ) मॉडेलिंग मधील पुढील स्तर आहे. 3D मॉडेल प्रमाणे यामध्ये मोठ्या प्रोजेक्ट चे तपशीलवार काल्पनिक (virtual ) मॉडेल तयार केले जाते. पण 3D  मॉडेल च्या पुढे जाऊन या तंत्रज्ञानामध्ये वापरकर्त्याला VR हेडसेट च्या साहाय्याने थेट आभासी वातावरणात जाणे शक्य होते. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष जागेवर गेल्याचा अनुभव प्राप्त होतो. 3D गेमिंग चा आनंद घेण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान हे बांधकाम क्षेत्रात अधिक लोकप्रिय होऊ लागले आहे. या तंत्रज्ञानामुळे नियोजित कामाची अंमलबजावणी करण्यापूर्वी  आभासी वास्तविकतेचा अनुभव घेणे शक्य झाले आहे.

वर्धित वास्तविकता (AR ) हे एक प्रगत तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये विद्यमान व वास्तविक जगाच्या दृश्यावर संगणक व्युत्पन्न (generated) प्रतिमांचे अधोरेखित करणे शक्य होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष जागेवर जाऊन केवळ मोबाइल च्या साहाय्याने चालू असलेल्या कामाचे 3D  मॉडेल व कामाचे तपशील दाखवणे शक्य होते. त्यामुळे मानवी चुका, गोंधळ किंवा असमज टाळणे शक्य झाले आहे.

२. बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग (BIM ).

क्लाऊड तंत्रज्ञानाच्या (cloud technology ) उदयामुळे हे तंत्रज्ञान आपले पाय बांधकाम क्षेत्रात घट्ट रोऊ लागले आहे. हि एक 3D मॉडेलिंग पद्धत आहे ज्यामुळे वापरकर्त्याला आराखडा, वेळापत्रक, खर्चाचे अंदाजपत्रक व 3D दृश्य एकाच वेळी पाहणे शक्य झाले आहे. ह्या तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठ्या प्रोजेक्टचे मॉडेल सर्व भागधारकांना एकाच वेळी शेअर करता येते त्यामुळे कोणालाही प्रोजेक्ट संबंधी माहिती कोणत्याही क्षणी तात्काळ व अद्यावत स्वरूपात मिळवता येते. या तंत्रज्ञानामुळे समन्वयाचा अभाव व वादावादी चे प्रकार टाळणे शक्य होत आहे.

३. इंटरनेट ऑफ थिंग्स ( IoT )

आजकाल स्मार्ट सिटींना महत्व येऊ लागले आहे ते या तंत्रज्ञानाच्या उद्यामुळेच.  इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ने जगाला दिलेले हे तंत्रज्ञान इंटरनेट व भौतिक गोष्टी यांना जोडते व सेन्सरच्या मदतीने माहितीचे रूपांतरण करते. या तंत्रज्ञानामध्ये सेन्सरचा वापर करून एखाद्या गोष्टीची चालू स्तिथी, कामगिरीचा स्तर तसेच भौतिक स्थितीचे परीक्षण करणे सहज सोपे झाले आहे. घरातील छोट्या मोठ्या उपकरणापासून ते बिल्डिंगच्या वेगवेगळ्या घटकामध्ये सेन्सरचा वापर करून त्यावर नियंत्रण ठेवता येते. उदा. मोबाईलवरून AC चालू किंवा बंद करणे, ऑफिस मध्ये असतानासुद्धा घर लॉक किंवा उघडणे. टाळी वाजवून दिवा लावणे किंवा बंद करणे. काँक्रिट क्युअरिंग तपासून कामाचा दर्जा व क्वॉलिटी तपासणे.

 

४. 3D प्रिंटिंग ( Additive Manufacturing )

या तंत्रज्ञानामुळे एखादे इंजिनिअरिंग  डिझाईन सहज स्केल मॉडेल किंवा खऱ्याखुऱ्या घटकामध्ये रूपांतरित करणे शक्य झाले आहे. BIM  तंत्रज्ञानांमुळे 3D प्रिंटिंग सोपे झाले आहे. बांधकाम क्षेत्राचा विचार करता अजूनही हे तंत्रज्ञान खूप प्राथमिक अवस्थेत आहे. परंतु येत्या काळात हे तंत्रज्ञान पूर्ण क्षेत्र व्यापून टाकू शकते.

५. रोबोट्स (Robots )

बांधकाम क्षेत्र हे सर्वात कमी अॅटोमेटेड क्षेत्रापैकी एक क्षेत्र आहे. हे क्षेत्र बहुतांशी बांधकाम मजुरांवर अवलंबून असणारे क्षेत्र आहे.परंतु या क्षेत्रातही रोबोट्स चा शिरकाव झाला आहे. 3D प्रिंटर रोबोट्स आपल्या गरजेनुसार मोठी इमारत सुद्धा बांधू शकतात. मोबाईल रोबोट्स 3D प्रिंटिंग हाताळू शकतात. सध्या बऱ्याच देशात वीट बांधकामासाठी रिमोट कंट्रोल असणारे रोबोट्स वापरले जातात. बांधकाम क्षेत्राची व्याप्ती पाहता नजीकच्या काळात रोबोट्सचा  वापर मोठ्या प्रमाणात केला जाणार आहे. 

६. ड्रोन्स (Drones ) [ Unmanned Aircraft System ]

ड्रोन्सच्या प्रवेशामुळे बांधकाम क्षेत्रात मोठा बदल होऊ पाहत आहे. प्लॅनिंग , सर्व्हे , माहिती गोळा करणे, परीक्षण करणे, उंच ठिकाणाचे मोजमाप करणे अशी  विविध कामे  ड्रोन्सच्या माध्यमातून कमी खर्चात व जलदगतीने होत असल्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचे स्वागत बांधकाम क्षेत्रात होऊ लागले आहे. कामाच्या ठिकाणी जाऊन आवश्यक रिपोर्ट्स  पटकन गोळा करता येऊ लागले आहेत.

वर दिलेले सहा तंत्रज्ञान खूप संक्षिप्त पद्धतीने मांडले आहेत. ह्या तंत्रज्ञानांची व्याप्ती पाहता बांधकाम क्षेत्रात बऱ्याच ठिकाणी यांची गरज भविष्यात लागणार आहे. त्या तुलनेने खूप ठिकाणी आजही अभियांत्रिकी मधला अभ्यासक्रम हा चाकोरी बाहेर शिकविला  जात नाही किंवा त्याचा अभ्यासक्रमात अद्याप समावेश करण्यात आलेला नाही. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात होऊ पाहत असणारे बदल लवकरात लवकर समजून व आत्मसात करणे गरजेचे आहे. अन्यथा वाढत्या स्पर्धेत टिकाव धरणे मुश्किल होईल. या तत्रंज्ञानामुळे होऊ पाहणारे बदल जर तुम्ही सकारत्मक दृष्टीने पहिले तर नजीकच्या काळात स्थापत्य अभियांत्रिकेचे महत्व खूपच वाढणार आहे हे मात्र नक्की. ही नवी बदलांची नांदी सर्व अभियंता यांना एक आशेचे नवे पर्व घेऊन आले  आहे.

 

लेखक

प्राध्यापक, जयदीप मोहनराव शिंदे 

विभागप्रमुख,स्थापत्य अभियांत्रिकी 

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव 

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

महाराष्ट्र पिन ४१६११२ 

मोबाईल : ९०९६२८०९४४ , 

email : 

jms@amgoi.edu.in , hodcivil@amgoi.edu.in 

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालय येथे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचे  विभागप्रमुख म्हणून काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते  स्थापत्य अभियांत्रिकी  या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात १४ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना बांधकाम क्षेत्रातील कन्स्लटिंग व कॉन्ट्रॅक्टींग कामाचा अनुभव  आहे. आतापर्यंत त्यांनी ३०० हुन अधिक बांधकाम पूर्ण केले आहेत.