Our Blog

परीक्षेच्या काळात आहार व्यायाम व अभ्यास यांचे संतुलन कसे ठेवावे

 

परीक्षेच्या काळात आहार व्यायाम व अभ्यास यांचे संतुलन कसे ठेवावे- CET, NEET, JEE mains व अन्य परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी खास लेख  

 

सध्या १२ वीची परीक्षा दिलेले विध्यार्थी विविध पात्रता प्रवेश परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. चांगले मार्क्स मिळवण्यासाठी सर्वजण त्यांच्या परीने खूप प्रयत्न करत आहेत.तसे  पाहायला गेले तर तयारी करण्यापासून ते परीक्षेचा दिवस या दरम्यान विविध पायऱ्या ओलांडत असताना मुलांमध्ये ताणतणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांचे आरोग्य चांगले असणे हे खूप महत्वाचे आहे. चांगले आरोग्य म्हणजे अभ्यासात अधिक चांगले लक्ष. त्यासाठी कोणतेही अवघड नियम पाळावे लागत नाहीत. अभ्यासासोबत जर तुम्ही आहार व व्यायामाबद्दल काही छोट्या गोष्टी समजावून घेतल्या तर या काळात तुमच्या मुलांचे आरोग्य उत्तम राखणे सहज शक्य होईल.

आहाराविषयी काही गोष्टी जाणून घेऊया  

१. शक्यतो जेवणाची वेळ टाळू नये.

प्रत्येकवेळचे जेवण हे शरीरासाठी महत्वाचे असते. तुमचे शरीर व मेंदू चांगले कार्यरत राहण्यासाठी त्याला ऊर्जेची आवश्यकता असते. त्यामुळे एक सकस आहारच ती पूर्तता करू शकते. जर तुम्ही जेवणाची वेळ चुकवली तर तुमचा भुकेच्या वेळी अपौष्टिक किंवा बाहेरील पदार्थ खाण्याकडे कल वाढतो. व असे पदार्थ तुमच्या शरीराची व मेंदूची गरज पूर्ण करू शकत नाही.

२. भरपूर पाणी प्या.

मन प्रसन्न राहण्यासाठी शरीराला पाण्याची आवश्यकता असते. मनावर आलेला ताण कमी करण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १२ ग्लास पाणी पिणे गरजेचे असते. त्यासाठी अभ्यासाला बसताना सोबत पाण्याने भरलेली बॉटल घेऊन बसावे. 

३. साखरेचे प्रमाण टाळा.

साखरेच्या अति सेवानामुळे स्थूलपणा वाढण्याची भीती असते. व पर्यायाने अभ्यासावरील लक्ष कमी होऊ शकते. शक्यतो सतत चहा किंवा कॉफी पिणे,  सोडा, कोल्ड्रिंक्स इ पदार्थ ज्यामध्ये साखरेचे प्रमाण असते त्यांचे सेवन टाळावे. या गोष्टीच्या अतिसेवनामुळे तणाव वाढू शकतो. 

४. नाष्ट्यामध्ये पौष्टिक पदार्थांना प्राधान्य द्या.

जेंव्हा तुम्हाला काही हलके खावेसे वाटते तेंव्हा साहजिकच तुम्ही पटकन मिळणारे पदार्थ निवडता. त्यामुळे कोणतेही अपौष्टिक पदार्थ निवडण्यापेक्षा असे पदार्थ निवडा जे शरीराचे पोषण करण्यास योग्य आहेत जसे कि बदाम, कडधान्ये, ताजी फळे किंवा घरी बनवलेले शिरा, उप्पीट इ.

व्यायामाविषयी  काही गोष्टी जाणून घेऊया

१. सकाळी व्यायाम करावे. 

दिवसभर उत्साही राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. शिवाय शरीर संतुलनासाठी व्यायाम गरजेचा आहे. सकाळी लवकर उठून धावणे, बैठका, सूर्यनमस्कार,प्राणायाम इ. व्यायाम प्रकार तुंम्हाला उपयुक्त ठरू शकतात.

२. प्रार्थना करणे.

शारीरिक व्यायामाबरोबर मानसिक स्वास्थ्य जपणेही तितकेच महत्वाचे असते.दिवसाची सुरुवात चांगली ऊर्जा घेऊन करणे कधीही फायदेशीर ठरते. त्यामुळे थोडावेळ प्रार्थनेत घालावा जेणेकरून मन प्रसन्न राहील, उत्साह वाढेल, व धीर येईल. 

३. पुरेशी विश्रांती घेणे.

बराच काळ अभ्यास केल्यामुळे शरीरास थकवा जाणवू लागतो. तसेच शरीरातील ऊर्जा कमी होते. अशावेळी नेहमी आपल्या शरीराचे ऐका. ओढूनताणून नेऊ नका. शरीराच्या व मनाच्या स्थितीत बदल करणे म्हणजेच विश्रांती असते. अंगणात फेरफटका मारणे, थोडावेळ वामकुक्षी घेणे, पाणी पिणे, सरबत अथवा फळांचा रस पिणे यामुळे आलेला ताण हलका होऊ शकतो. बदल म्हणून टीव्ही अथवा मोबाईल फोनचा वापर टाळावा. 

अभ्यासाविषयी काही गोष्टी जाणून घेऊया 

१. चिंतन करणे.

अभ्यास करताना सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे केलेल्या अभ्यासाचे चिंतन करणे. जे दीर्घकाळ स्मृतीत राहण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. व त्यासाठी सर्वात चांगला काळ हा सकाळचा असतो. रात्रीची पुरेशी विश्रांती व सकाळी उठून व्यायाम व प्रार्थना केल्यानंतर प्रसन्न मनाने चिंतन केल्यास फायदेशीर ठरू शकते.

२. एकसारखा अभ्यास करणे टाळावे.

एकसारखा अभ्यास केल्यामुळे मनावर दबाव वाढतो व शरीरही थकून जाते.जे तुमच्या पुढील नियोजनावर प्रतिकूल परिणाम करते. यासाठी वेळापत्रक करावे व विश्रांती घेऊनच पुढील अभ्यास चालू करावा. दिवसभरात ५ ते ६ तासांचा अभ्यास दोन टप्प्यात करणे सहज शक्य आहे.

३. उजळणी करावी.

दिवसभर केलेल्या अभ्यासाची सायंकाळी एकदा अवश्य उजळणी करावी. तुम्हाला हाती घेतलेला विषय कितपत समजला आहे ते कळते व तुमचे नियोजन योग्य दिशेने चालू आहे याची खात्री होते.

४. सराव करावा.

नुसते उजळणी करणे पुरेसे नाही तर केलेल्या अभ्यासाचा सराव करणेही तितकेच महत्वाचे आहे. त्यामुळे रात्री दिवसभर केलेल्या अभ्यासाचा सराव प्रश्नपत्रिका किंवा सराव चाचणी सोडवून करावा. ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

१२ वी परीक्षा व पुढील वाटा निवडताना द्याव्या लागणाऱ्या विविध पात्रता परीक्षा ह्या विद्यार्थी तसेच पालक यांच्या दृष्टीने खूप महत्वाच्या असतात. परंतु त्यासोबत आहार, व्यायाम व अभ्यास यांचे संतुलन का व कसे साधावे हे बऱ्याच जणांना माहित नसते किंवा त्याकडे दुर्लक्ष होते. या गोष्टीचे संतुलन साधने किती महत्वाचे असते हे सांगण्याच्या उद्देशाने या लेखामध्ये दृष्टिक्षेप टाकण्यात आला आहे. हा लेख विद्यार्थी व पालकांना नक्की उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. संपूर्ण लेख वाचल्याबद्दल आभारी आहे.

या लेखासोबत आहार, व्यायाम व अभ्यास यांचे संतुलन साधण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक तक्ता माहितीस्तव  खाली दिला आहे त्यावरतीही एकदा नजर टाकावी हि विनंती.

धन्यवाद !!!

(अस्वीकारण ( Disclaimer ) : सदरच्या लेखात दिलेला सल्ला हा केवळ सामान्य माहिती प्रदान करतो. हा कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय अभिप्रायास पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ज्ञ किंवा आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

 

लेखक

प्राध्यापक प्रवीण बी घेवारी 

डायरेक्टर,

अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स,

 वाठार तर्फ वडगाव 

ता. हातकणंगले जि. कोल्हापूर 

महाराष्ट्र पिन ४१६११२ 

मोबाईल : ७९१२८८२८०८, 

email : director@amgoi.edu.in 

लेखकाबद्दल थोडक्यात माहिती

लेखक सध्या अशोकराव माने अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये प्राचार्य पदी काम करत आहेत. त्याचप्रमाणे ते  इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या शाखेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्ष प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांना ऍडमिशन  तसेच करिअर कॉऊंसेल्लिंग चा चांगला अनुभव आहे.